- पीएमआरडीचं कारवाईकडे दुर्लक्ष?..
- अतिक्रमण हटविण्याची तक्रारदाराची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 29 एप्रिल 2026) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हद्दीतील भूगाव येथे अनाधिकृत बांधकाम व रस्ता खोदकामाचा प्रकार समोर आला असून, याबाबत प्रशासनाकडे एकाने तक्रार देखील केली आहे.
दरम्यान तक्रारदार महेश विलास तारू यांनी महानगर आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार, भूगाव (ता. मुळशी) येथील स.नं. ४४/५ परिसरात संबंधित व्यक्तीकडून विनापरवाना अतिक्रमण उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अभिजीत मालुसुर्वे यांनी फॉरेस्ट ट्रेल, पंराजपे गेट परिसरात प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृत शेड, दुकाने व शॉप्स उभारली आहेत. तसेच रस्ता खोदून त्या ठिकाणी अनधिकृतपणे नर्सरी तयार करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच अतिक्रमण त्वरित पाडण्यात यावे, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. याशिवाय रस्ता खोदून उभारण्यात आलेल्या नर्सरीवरही कठोर कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. दरम्यान, या प्रकरणात पीएमआरडीए प्रशासन तातडीने कारवाई करणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भूगाव येथील संबंधित प्रकरणाची माहिती मागविण्यात आली आहे. शेजारील बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांच्या परवानगी फाईलींची तपासणी करण्यात येणार आहे. रस्त्यावर अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
– आशा होळकर, तहसीलदार, PMRDA…











