- प्रभाग २५ व २६ मध्ये ४३ पत्राशेड हटवले; प्रशासनाचा कठोर इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २५ व २६ मध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेडवर मोठ्या प्रमाणात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत जगताप डेअरी ते कस्पटे वस्ती आणि वाकड चौक ते भुजबळ चौक परिसरातील एकूण ४३ पत्राशेड हटवण्यात आले. या कारवाईत सुमारे ६३ हजार १८४ चौ.फूट अतिक्रमण हटवण्यात आले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सुमारे १५० अधिकारी-कर्मचारी, पोलीस बंदोबस्त, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच जेसीबी व ट्रक्टरच्या सहाय्याने कारवाई पार पडली.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर पावले उचलली जातील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.












