- प्रतिबंधित पानमसाला व तंबाखू विक्रीप्रकरणी दोघांना अटक…
- चऱ्होली फाटा परिसरातील दोन पानशॉपवर धाड; मोठ्या प्रमाणात साठा जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- दिघी परिसरातील चऱ्होली फाटा भागात अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन पानशॉपवर धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पहिली कारवाई दि. २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता सुदामा पानशॉप, धर्मवीर चौक, चऱ्होली फाटा येथे करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय मधुकर शेळके यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी दत्तात्रय बन्सी काळे याच्याकडे राजनिवास सुगंधित पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, आर.एम.डी पान मसाला, विमल पान मसाला, शॉट ९९९ लक्झरी चिविंग टोबॅको, वी-१, एम गोल्ड, जाफराणी जर्दा असे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री व साठा करताना आढळून आले. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
त्यानंतर त्याच दिवशी दुपारी सुमारे ४.३० वाजता सावकार पानशॉप, अनमोल बेकरीसमोर, द्वारका सोसायटीसमोर, चऱ्होली फाटा येथे दुसरी कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिवराज लोहार यांच्या पथकाने छापा टाकून आरोपी क्षितीज शिवाजी गावडे (वय २५) यास ताब्यात घेतले. या ठिकाणीही राजनिवास सुगंधित पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, आर.एम.डी पानमसाला, रजनीगंधा फ्लेवर पानमसाला, विमल पान मसाला, शॉट ९९९ लक्झरी चिविंग टोबॅको, वी-१, एम गोल्ड, जाफराणी जर्दा, एसटी-१, तुलसी टोबॅको अशा प्रतिबंधित पदार्थांचा साठा व विक्री सुरू असल्याचे आढळले.
दोन्ही कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव व जगताप करीत आहेत.













