- बनावट ईमेलद्वारे कंपनीची फसवणूक; परदेशी बँकेशी समन्वय साधत १००% रक्कम सुरक्षित परत—सायबर पोलिसांची तत्पर कारवाई यशस्वी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याने एका गुंतागुंतीच्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत तक्रारदाराची १००% रक्कम, म्हणजेच ५६ लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. परदेशातील बँकेशी समन्वय साधून ही रक्कम गोठवण्यात आणि ती पुन्हा भारतात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
भोसरी येथील ‘PHBB VALVES PVT LTD’ या कंपनीचे मालक संजय जाधव यांची परदेशातील ‘Wenzhou Artech Machinery Technology co.LTD’ या कंपनीशी व्यावसायिक देवाणघेवाण सुरू असते. दरम्यान, अज्ञात भामट्याने मूळ कंपनीशी साधर्म्य असलेला एक बनावट ईमेल आयडी तयार केला. या ईमेलद्वारे जाधव यांना कंपनीचे बँक खाते बदलल्याचे भासवून, नवीन (यू.एस.ए.) बँक खात्यावर ५६ लाख रुपये पाठवण्यास सांगितले.
तक्रारदार जाधव यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी ही रक्कम पाठवली. मात्र, मूळ कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ऑनलाइन तक्रार नोंदवली आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तक्रारीचे गांभीर्य ओळखून सायबर पोलीस ठाण्याने तातडीने चक्र फिरवली. फसवणुकीची रक्कम ज्या ‘सिटीझन बँक’ (अमेरिका) मध्ये जमा झाली होती, त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. बँक परदेशातील असल्याने पत्रव्यवहार आणि समन्वयात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने सविस्तर माहिती देऊन आणि सातत्याने पाठपुरावा करून ती रक्कम फ्रिज (गोठवून) करण्यात यश मिळवले. अखेर पोलिसांच्या या ‘धडाकेबाज’ प्रयत्नांमुळे तक्रारदाराची संपूर्ण ५६ लाख रुपयांची रक्कम त्यांच्या मूळ खात्यात सुरक्षितपणे जमा झाली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, महिला पोलीस हवालदार रेणूका वाव्हळ, पोहवा दिपक भोसले, विनायक म्हसकर, पोलीस अंमलदार सोपान बोधवड आणि माधव आरोटे यांचा समावेश होता.














