विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. ७ मे २०२६ :- बदलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिका शाळांमध्ये खासगी कंत्राटदारांमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांऐवजी ‘मेस्को’ (MESCO) या शासकीय संस्थेमार्फत माजी सैनिकांची नियुक्ती करावी, अशी मागणी ‘आप’ युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रविराज काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनेक ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक अप्रशिक्षित व शिस्तहीन असल्याच्या तक्रारी पालकांकडून येत आहेत. काही रक्षक ड्युटीवर असताना नशेच्या अवस्थेत आढळणे किंवा शाळा परिसरात टवाळखोरांना थारा देणे, अशा गंभीर बाबी समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी सैनिकांची नियुक्ती केल्यास शिस्त, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मुलींच्या व प्राथमिक शाळांमध्ये प्राधान्याने माजी सैनिकांची नियुक्ती करावी तसेच तक्रारी असलेल्या खासगी कंत्राटदारांचे करार तातडीने रद्द करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.













