- खा. बारणे यांच्या आक्षेपांनंतर महापालिकेचे सेफ्टी ऑडिट; आता उद्घाटनाची तयारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत | दि. ७ मे २०२६ :- औंध-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक चौकातील बहुचर्चित उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, गेल्या काही महिन्यांपासून या पुलाभोवती रंगलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नव्या वळणावर आणले आहे. स्थायी समिती सभापतींनी पत्रकार परिषदेत पुढील पंधरा दिवसांत या पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची घोषणा केली. “पुलावरील सर्व सुरक्षाविषयक त्रुटी दूर करण्यात आल्या असून आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत,” असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
दरम्यान “तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होऊ शकतात,” असा गंभीर इशारा देत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी काही दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. पुलाची लांबी वाढवून उतार कमी करण्याच्या सूचना देतानाच, उपाययोजना न करता पूल खुला केल्यास संबंधित अधिकारी आणि कन्सल्टंटवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आणि भाजपच्या नगरसेविका आरती चोंधे यांनी बारणे यांच्यावर थेट पलटवार केला. “उड्डाणपुलाचे काम सुरू असताना पाहणी का केली नाही? अंतिम टप्प्यातच आक्षेप का आठवले?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी “आधी डांगे चौकातील सबवे कोंडीमुक्त करा,” असा टोला लगावला होता.
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुलाचे सेफ्टी ऑडिट पूर्ण केले आहे.
आता उत्सुकता एका प्रश्नाची आहे, ती अशी की, खा. श्रीरंग बारणे आपली विरोधाची तलवार म्यान करतात की उद्घाटनाआधी पुन्हा नवी राजकीय खेळी करतात? कारण रक्षक चौकातील हा उड्डाणपूल सध्या वाहतुकीपेक्षा अधिक राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.














