न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ मे २०२६) :- जुन्या व्यवहाराचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना चिखलीतील कुदळवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अफताब आलम अब्दुल मंत्रान शेख (वय २८, रा. कुदळवाडी, मूळ रा. सिद्धार्थनगर) हे दि. ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे जुने राहिलेले पैसे मागण्यासाठी आरोपी मुस्ताक चौधरी याच्या दुकानावर गेले होते.
पैशांची मागणी केली असता, आरोपी मुस्ताक याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर तीन साथीदारांनी अफताब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाण सुरू असतानाच आरोपी इरशाद चौधरी याने लोखंडी रॉडने अफताब यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर गंभीर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले आहेत.
या प्रकरणी मुस्ताक चौधरी, इरशाद चौधरी, मुमताज चौधरी, फिरोज चौधरी (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार घुमटकर करत आहेत. पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावली असून अधिक तपास सुरू आहे.














