पिंपरी चिंचवड (दि. ०७ मे २०२६) :- इन्स्टाग्राम स्टोरीवरून झालेल्या वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाकडमध्ये घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मे) रात्री ९.३० च्या सुमारास वाकड येथील दत्त मंदिर रोडवरील माऊली चौक परिसरात ही घटना घडली. उत्कर्ष आकाश जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याची आई संगीता आकाश जाधव (वय ४९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आरोपी क्रमांक ३ याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उत्कर्षला उद्देशून एक स्टोरी ठेवली होती. या स्टोरीबाबत उत्कर्षने त्याला जाब विचारला. याच कारणावरून चिडलेल्या आरोपींनी संगनमत करून उत्कर्षवर हल्ला केला.
आरोपींनी उत्कर्षला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर आणि पायावर कोयत्याने गंभीर वार केले. एवढेच नव्हे तर, परिसरात हातातील कोयते हवेत फिरवून मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण केली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
वाकड पोलिसांनी या प्रकरणी
१. दत्तात्रय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ (वय १८, रा. वाकड) – अटक
२. सूरज भुजबळ (वय २२, रा. वाकड) – फरार
३. दोन विधिसंघर्षित बालक (अल्पवयीन) – पालकांच्या ताब्यात दिले या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.














