- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई; सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ मे २०२६) :- आळंदी येथील इंद्रायणी नदीवर नविन बांधण्यात आलेल्या पुलावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३२ वाजेच्या सुमारास, आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलावर विद्युत खांब क्रमांक ३ जवळ एक महिला संशयास्पद रित्या उभी होती. ही महिला येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे लैंगिक हावभाव करून आणि शब्दांचा वापर करून वेश्याव्यवसायासाठी आकर्षित करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे सभ्यतेचा भंग करून अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हवालदार गणेश सिताराम कारोटे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत. आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.














