- डॉ. नोहेरा शेख यांच्याविरोधात पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल; पैसे परत करण्याचे आश्वासनही ठरले फोल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ मे २०२६) :- गुंतवणुकीवर वार्षिक ३६ टक्के परताव्याचे आमिष दाखवून पिंपरीतील एका व्यावसायिकाची आणि त्यांच्या वडिलांची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘हिरा ग्रुप’च्या मालकीण डॉ. नोहेरा शेख यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलीम लालमोहंमद हन्नूरे (वय ५२, रा. पिंपरी) आणि त्यांच्या वडिलांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये हैद्राबाद येथील ‘हिरा ग्रुप’मध्ये गुंतवणूक केली होती. हन्नूरे यांनी २१ लाख आणि त्यांच्या वडिलांनी ४ लाख असे एकूण २५ लाख रुपये या कंपनीत गुंतवले होते. सुरुवातीला त्यांना ७९ हजार रुपयांचा परतावा मिळाला, मात्र त्यानंतर परतावा आणि मूळ रक्कम मिळणे बंद झाले.
डॉ. नोहेरा शेख यांना यापूर्वीच देशातील विविध ठिकाणच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात ऑक्टोबर २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. जानेवारी २०२१ मध्ये जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुणे येथील येरवडा भागात गुंतवणूकदारांची बैठक घेतली होती. “सर्व गुंतवणूकदारांचे पैसे कंपनी परत करेल, कुणीही गुन्हे दाखल करू नका,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. या विश्वासापोटी फिर्यादी यांनी त्यावेळी तक्रार दिली नव्हती. मात्र, दीर्घ काळ उलटूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करत आहेत.













