- दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये बिबट्याने ठोकला तळ..
- कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण..
- कुरुळी परिसरातील कंपनीत दोन दिवस बिबट्याचा वावर..
- वनविभागाचे शोधकार्य सुरू…
आशिष लोखंडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ८ मे २०२६) :- चाकण एमआयडीसी परिसरातील दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याची घटना समोर आल्याने औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः कुरुळी येथील एका नामांकित कंपनीच्या परिसरात बिबट्या सलग दोन दिवस तळ ठोकून असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे कामगार आणि कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास कंपनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरताना दिसून आला. ही माहिती समोर आल्यानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. मात्र, पहिल्या दिवशी बिबट्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, गुरुवारी पुन्हा एकदा त्याच परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली. काही कामगारांनी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याचा दावा केला असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. कंपनी प्रशासनाकडून कामगारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वनविभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. बिबट्या जवळील डोंगराळ किंवा झाडीच्या भागातून भक्ष्याच्या शोधात औद्योगिक परिसरात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आले नसून वनविभागाकडून नागरिकांना आणि कामगारांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चाकण एमआयडीसीसारख्या गजबजलेल्या औद्योगिक क्षेत्रात बिबट्याचा वावर आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.













