न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०८ जून २०२६) :- खेड-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ६ जून रोजी खेड तालुक्यातील विविध रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. विकासकामांना विनाकारण विरोध करणारे तसेच शासकीय कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी, प्रभारी सहआयुक्त हिम्मत खराडे, सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, सहायक नगररचनाकार सुजित पानसरे, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. चौधरी यांनी खेड तालुक्यातील सात प्रमुख मार्गांची पाहणी केली. खराबवाडी, नाणेकरवाडी आणि मेदनकरवाडी परिसरातील रस्ते प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध व प्रलंबित मोजणीमुळे रखडल्याचे निदर्शनास आले. चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, सर्व प्रशासकीय अडचणी दूर करून प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
भूसंपादन, मोजणी किंवा इतर शासकीय प्रक्रियांमध्ये जाणीवपूर्वक असहकार्य करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश देत विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पीएमआरडीएच्या या भूमिकेमुळे खेड तालुक्यातील प्रलंबित रस्ते प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















