- पुनर्वसन प्रकल्पावरून दोन गटातील झोपडीधारकांमध्येच र्हाडा..
- विकसकाविरोधात कारवाईची मागणी…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ जून २०२६) :- पिंपरी परिसरातील यशवंत नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुनर्वसन इमारतीत प्रवेश घेतलेल्या नागरिकांचा आणि अद्याप झोपड्या न सोडणाऱ्या रहिवाशांचा वाद विकोपाला जाऊन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एसआरए अंतर्गत राबविण्यात आलेल्या या पुनर्वसन योजनेत उभारलेल्या इमारतींमध्ये सुमारे २०० हून अधिक झोपडीधारकांनी गेल्या सहा महिन्यांत प्रवेश घेतला आहे. मात्र पात्र-अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत सुमारे ७० झोपडीधारकांनी पुनर्वसन इमारतीत जाण्यास नकार दिला आहे. विकसकाने सर्वेक्षणानंतर पात्र आणि अपात्र यादी जाहीर केली होती. त्यानंतर अपात्र ठरलेल्या काही नागरिकांनी झोपड्या न सोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, साई मिरॅकल या विकसक कंपनीने उर्वरित झोपड्या हटविण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर वाद अधिकच चिघळला. झोपड्या पाडण्याच्या कारवाईला विरोध करताना दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रात्री उशिरा पुन्हा तणाव निर्माण होऊन दगडफेक व मारहाणीच्या घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही महिला जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.
जखमी महिलांच्या तक्रारी पोलिसांनी नोंदवून घेतल्या नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच विकासकाने वीज व पाणीपुरवठा बंद केल्याचाही आरोप करण्यात आला. याप्रकरणी नागरिकांनी महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर परिसरातील वीज व पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विकसकाविरोधात कारवाईची मागणी जोर धरत असून परिसरात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“यशवंत नगर परिसरातील वादाच्या संदर्भात या प्रकरणाची एनसी (अदखलपात्र गुन्हा) नोंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी.”
— सुहास आव्हाड, वरिष्ठ पोलीस अधिकारी, संत तुकारामनगर…

















