- नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची आयुक्तांकडे मागणी…
- मोजणी पूर्ण होऊनही हद्द निश्चित नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम, विकासकामांवर परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रेड झोन क्षेत्राची हद्द तात्काळ कायम करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेमार्फत रेड झोन क्षेत्राची आवश्यक मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. मात्र, मोजणी पूर्ण होऊनही संबंधित क्षेत्राची अधिकृत हद्द अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक, मालमत्ताधारक तसेच विविध विकासकामांच्या नियोजनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
रेड झोनची स्पष्ट हद्द निश्चित नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून बांधकाम परवानग्या, मालमत्तेशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर विकासकामेही प्रलंबित राहत असल्याचे नगरसेविका तरस यांनी नमूद केले आहे.
महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या मोजणीच्या आधारे रेड झोनची हद्द तातडीने कायम करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच प्रलंबित प्रशासकीय कामांना गती द्यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. या मागणीमुळे रेड झोनमधील हजारो नागरिकांच्या दीर्घकालीन प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.















