न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ जून २०२६) :- महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ’ पुणे विभागांतर्गत कामगार कल्याण भवन, सहकारनगर यांच्या ‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळजाई टेकडीवर भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्यस्तरीय ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वनमित्र पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांनी तळजाई टेकडीवर दहा हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करीत विविध पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संजय विद्वांस, पुणे शहर गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सदस्य मुकुंद खटावकर, पुणे विभागाचे प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी उद्धव रामराजे, अधिक्षक संजय थोरात, सहाय्यक अधिक्षक सुधाकर पाटील, कनिष्ठ लिपिक तुषार रावळ, अरुण डोळे, कामगार कल्याण भवनाचे केंद्र संचालक सुहास माने , केंद्र महिला कल्याण सहायिका शोभा पोंगारे, केंद्र सेवक विकास पवार, रंजना बाठे सुहास भोसले आदी उपस्थित होते.
वृक्षमित्र अरुण पवार यांनी पर्यावरणाची ढासळती स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येकाने कृतीशील होण्याचे आवाहन केले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी यावर्षी दहा हजार वृक्ष दान करण्याचा आणि वृक्षांची स्वतः लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा महासंकल्प केला.
संजय विद्वांस व मुकुंद खटावकर यांनीही वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद करत कामगार कल्याण मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता ‘झाडे लावा.. झाडे जगवा..’ आणि निसर्ग रक्षणाची सामूहिक शपथ घेऊन केली.















