- CAFO नंतर आता जेई, डेप्युटी रडारवर?…
- नगरसेवकांवरील कारवाई वेटींगवर?…
- काय म्हणाले? शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित ६० कोटी १८ लाखांच्या बोगस उपसूचना घोटाळ्याप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी (CAFO) यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता दोषी कनिष्ठ अभियंते (JE) आणि उपअभियंते (Deputy Engineer) यांच्यावरही कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित ‘नरसिंह महायज्ञा’ची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी साठ कोटींच्या घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर काटे म्हणाले, “हा घोटाळा भाजपनेच उघडकीस आणला आहे. पहिल्या चौकशी अहवालानुसार CAFO वर कारवाई झाली असून दुसऱ्या अहवालानुसार संबंधित दोषी JE आणि डेप्युटींवरही कारवाई होईल.”
CAFO ची बदली…
महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १४ बनावट उपसूचनांद्वारे विशिष्ट कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी ६० कोटी १८ लाख रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या २४३ पानी अहवालात १७ पैकी १४ उपसूचना बनावट असल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणातील तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाने त्यांची बदली केली आहे.
नगरसेवकांवर कारवाई कधी?…
मात्र या घोटाळ्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. चौकशीत बोगस उपसूचनांवर काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचाही उल्लेख असल्याची चर्चा असताना संबंधित लोकप्रतिनिधींवर कारवाईबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे “अधिकाऱ्यांवर कारवाई होत असेल तर दोषी नगरसेवकांवर कारवाई कधी?” असा सवाल आता नागरिक आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.















