- सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बंद..
- विरोधक आजची सभा डोक्यावर घेणार काय?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज सोमवारी (दि. १५) होत असली तरी, सभेपूर्वीच अनेक वादग्रस्त मुद्द्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे असून, सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
सभेच्या विषयपत्रिकेत सात विषयांचा समावेश असला तरी नागरिकांचे लक्ष दोन मुद्द्यांकडे लागले आहे. एक म्हणजे स्वीकृत सदस्य निवड आणि दुसरे म्हणजे सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय. पारदर्शक प्रशासनाचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच आता सभेचे ऑनलाइन प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीबाबत भाजपमध्ये अद्याप एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा पुढे ढकलला जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विकास आराखडा समितीतील सदस्य निवडीवरही राजकीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सभेत मिळकत करवाढ, क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्विभागणी, पुनावळे येथील शाळेच्या आरक्षणाची जागा भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव यांसारखे महत्त्वाचे विषय चर्चेला येणार आहेत. मात्र, या विषयांवर सविस्तर चर्चा नागरिकांना पाहता येऊ नये म्हणूनच ऑनलाइन प्रक्षेपण बंद करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
माहितीवर पडदा?…
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना घरबसल्या सभा पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. मात्र, या प्रक्षेपणादरम्यान अनेक वेळा सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली, वादग्रस्त वक्तव्ये समोर आली आणि काही प्रसंगी महापौरांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळही आली होती. याच पार्श्वभूमीवर आता थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नागरिकांना प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका होत असून, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात मात्र माहितीवर पडदा टाकण्याचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जात आहे. त्यामुळे आजची सर्वसाधारण सभा केवळ विषयांमुळेच नव्हे तर पारदर्शकतेवरून निर्माण झालेल्या वादामुळेही गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














