- एस.सी प्रवर्गाच्या जागी शासनाची दिशाभूल व फसवणूक करून नोकरी मिळवल्याचा ठपका.
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 14 जून 2026) :- माध्यमिक विद्यालय करूंज मु.पो.करूंज ता.मावळ जि.पुणे या शाळेतील कार्यरत शिक्षक श्री.गणेश हरिभाऊ दातीर यांना संस्थेने दिनांक.१५.०६.२०२६ रोजी पासून त्यांची चौकशी करणेकामी निलंबित केलेले आहे. निलंबन आदेशामध्ये त्यांना निलंबित कालावधीमध्ये संस्थेच्या परवानगीशिवाय मुख्यालय (राहते गाव) सोडू नये, निलंबन कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी नोकरी करू नये, निलंबन रद्द करण्यासाठी संस्थेवर दबाव टाकू नये व शाळेमध्ये हस्तक्षेप करू नये अशा अटी-शर्ती घालण्यात आल्या असून त्याचे पालन करावे असे नमूद केले आहे.
श्री.गणेश हरिभाऊ दातीर यांच्यावर सन-२०११ च्या दरम्यान तत्कालीन तथा बडतर्फ मुख्याध्यापक श्री.जनार्दन दिगंबर बोरोले यांच्याशी संगणमत करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करत मागासवर्गीयातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शिक्षित व बेरोजगार असलेल्या उमेदवारास त्यांच्या संविधानिक व कायदेशीर अधिकारापासून वंचित ठेवून खोटे दस्तऐवज बनवत स्वतःची शिक्षक नियुक्ती करून घेतली व त्यास शिक्षण विभागाकडून वैयक्तिक मान्यता प्राप्त करून घेतली. संबंधित नियुक्तीस जाहिरात, गुणदान तक्ता, निवड यादी, मुलाखत यादी, रोस्टर व इतर कोणतेही दस्तऐवज सादर न करता परस्पर बडतर्फ मुख्याध्यापक श्री जनार्दन दिगंबर बोरोले यांच्याशी संगणमत करून श्री.गणेश हरिभाऊ दातीर यांनी नोकरी मिळवली असा ठपका त्यांच्यावर आहे.
शासनाने बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घेतलेल्या शिक्षकांची एस.आय.टी (विशेष तपास पथक) स्थापन करून चौकशा सुरू केल्या असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवा समाप्त करणे बाबत कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये संबंधित श्री गणेश हरिभाऊ दातीर यांचेही नाव असल्याने त्यांची चौकशी सुरू आहे.सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी या संस्थेने शासनाच्या तसेच प्रचलित कायद्याचे पालन करून श्री गणेश हरिभाऊ दातीर यांच्या बोगस नियुक्ती बाबत प्रथम दर्शनी चौकशी केली असता संबंधित शिक्षकाचे नियुक्ती तथा मान्यता ही बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे श्री गणेश हरिभाऊ दातीर यांना महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा सेवाशर्ती १९८१ मधील तरतुदीनुसार सखोल चौकशी करण्याचा संस्थेने निर्णय घेतला व त्यानुसार त्यांना आरोपाचे अभिकथन पत्र ही पाठवण्यात आले व चौकशी सुरू केली. परंतु स्वतःची बनावट नियुक्ती रद्द होऊ नये किंवा उघड होऊ नये यासाठी श्री गणेश हरिभाऊ दातीर यांनी कायद्याप्रमाणे काम करणाऱ्या संस्थेवर सोशल मीडियाद्वारे खोटे आरोप केले व संस्थेची समाजामध्ये प्रतिमा मलीन केली. त्याप्रमाणे शिक्षण खात्याच्या विविध कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सुरक्षितता धोक्यात आणून बेकायदेशीर रित्या आंदोलने केली. तसेच शाळेमध्ये षडयंत्र रचून शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला. असे त्यांना बजावलेल्या आरोपाच्या अभिकथन पत्रात नमूद केले आहे.
प्रतिक्रिया…
सद्यस्थितीत सन-२०२० पासून माध्यमिक विद्यालय करूंज मु.पो.करूंज ता.मावळ जि.पुणे ही शाळा आमच्या संस्थेमार्फत चालवली जाते. संस्था शिक्षण खात्याच्या कायद्याचे पालन करून प्रशासकीय कारभार चालवते. त्यामुळे श्री.गणेश हरिभाऊ दातीर यांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन संस्था कदापी करणार नाही. संस्थेने त्यांनी मिळवलेल्या बनावट व बोगस नियुक्तीची सखोल चौकशी करत अंतिम निर्णय घेणेकामी श्री.गणेश हरिभाऊ दातीर यांचे निलंबन केले आहे. श्री. गणेश हरिभाऊ दातीर यांनी चौकशीला सामोरे जाऊन स्वतःची बाजू पुराव्यासहित मांडावी जेणेकरून संस्थेस त्यांच्या सेवेबाबत योग्य तो निर्णय घेता येईल.
– श्री. संभाजीराव शिरसाट सचिव:- सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी, मोशी प्राधिकरण, पुणे.














