- खुलेआम गुटखा विक्री जोमात…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 15 जून 2026) :- FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाल्याचा व्यापार, साठवणूक आढळल्यास संबंधितांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांत खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे नेहमीपेक्षा जास्त किमतीमध्ये विक्री केली जात आहे त्यामुळे बंदी असलेल्या पदार्थांची विक्री रोखण्यात संबंधित यंत्रणांना कितपत यश आले आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील काही पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमधून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः युवक आणि अल्पवयीन मुलांपर्यंतही हे पदार्थ पोहोचत असल्याने पालक आणि सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.
गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असतानाही काही विक्रेते नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे प्रशासनाने विशेष पथके तयार करून नियमित तपासण्या कराव्यात, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा अवैध व्यवसायांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.















