न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २३ जून २०२६ :- पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तत्त्वतः सहमती दर्शविण्यात आली.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतील या केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात १० हेक्टर आणि दुसऱ्या टप्प्यात ५ हेक्टर जागा उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे. आदिवासी व वंचित घटकांतील मुलांसाठी कला, कौशल्य आणि पारंपरिक कारागिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित सात प्रलंबित महसूल विषय बैठकीत मांडले. मोशी येथे आयआयएम नागपूरच्या उपशाखेसाठी जागा हस्तांतरण, प्राधिकरण मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड, नगर भूमापन कार्यक्षेत्र विस्तार, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती आणि अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या निर्णयांमुळे शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती मिळणार असून पिंपरी-चिंचवडच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.















