न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जून २०२६) :- इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहू येथील गाथा मंदिरातून प्रारंभ झालेल्या या वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग घेत २३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.
दहाव्या वर्षानिमित्त आयोजित या वारीत देशभरातील सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यामध्ये सुमारे ३०० महिला आणि १०० हून अधिक बालसायकलस्वारांचा समावेश होता. इंडो अथलेटिक्स सोसायटीचे वारी प्रमुख गिरीराज उमरीकर यांनी ही माहिती दिली.
२०१६ मध्ये अवघ्या सात सायकलस्वारांसह सुरू झालेल्या या उपक्रमाने यंदा २३५० सहभागींचा टप्पा गाठत भारतातील सर्वात मोठ्या सायकल वारीचा मान मिळवला आहे. पीसीएमसी, एमआयडीसी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. सायकल वारीच्या यशस्वी आयोजनामुळे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.















