न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- निगडी सेक्टर २२, संग्रामनगर झोपडपट्टी, श्रमिकनगर, राहुलनगर, फातिमा मस्जिद परिसर आणि पीसीएमसी कॉलनीतील १ ते १५ इमारतींच्या परिसराची महापौरांनी पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरवर्षी पावसाळ्यात या भागात पाणी शिरून घरगुती साहित्य व अन्नधान्याचे नुकसान होत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुलनगर ते निगडी स्मशानभूमीपर्यंत कॅन्टोन्मेंट परिसरातून येणारे पावसाचे पाणी थेट नाल्यात वळविण्यासाठी मोठा पावसाळी नाला उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच जीर्ण झालेल्या पीसीएमसी कॉलनीतील इमारतींची संपूर्ण दुरुस्ती महापालिकेने करावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावर महापौरांनी नागरिकांना पीसीएमसी कॉलनीतील इमारतींची दुरुस्ती महापालिकेमार्फत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे तसेच राजू गायकवाड, अक्षय करंडे आणि परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


















