- अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली अग्निसुरक्षा साहित्याची माहिती व प्रात्यक्षिक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मोशी येथील सिटी प्राईड स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मोशी अग्निशमन केंद्रात अग्निसुरक्षा साहित्य प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी अग्निशमन जवानांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या कार्यपद्धतीसह अग्निशमनासाठी वापरली जाणारी विविध उपकरणे, बचाव साहित्य आणि अग्निशमन वाहनांची माहिती दिली. आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या पद्धती, प्राथमिक उपाययोजना तसेच मदतीसाठी १०१ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अग्निशमन वाहनांची पाहणी करून विविध उपकरणांची प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, शालेय स्तरावर सुरक्षिततेची संस्कृती रुजविण्यासाठी असे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार आहेत.


















