- आमदार राजेंद्र राऊत व सुनील कांबळे यांचा सत्कार…
- विविध विषयांवर सकारात्मक चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० ऑगस्ट २०२६) :- शहरातील सोलापूरवासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार समारंभाच्या निमित्ताने सोलापूर विधान परिषद मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत आणि पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या निवासस्थानी रविवारी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार सुनील कांबळे यांचे आमदार शंकर जगताप यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्नेहभेटीदरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासह विविध सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील सोलापूरवासीयांच्या विविध विषयांबाबतही सकारात्मक संवाद झाला.
दोन्ही लोकप्रतिनिधींच्या भेटीमुळे शहरातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परस्पर संवादातून सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर समन्वय अधिक दृढ करण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विनोद नढे, माऊली जगताप, कुणाल वाव्हळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सोलापूरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्नेहभेटीमुळे पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर यांच्यातील सामाजिक व राजकीय संवादाला आणखी बळ मिळण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


















