- बोगस हजेरीला वाव?; १२ कोटींच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या हजेरीसाठी वापरण्यात येणाऱ्या फेस रिडिंग आणि थंब बायोमेट्रिक मशिन्स वारंवार बंद पडत असल्याने सुमारे १२ कोटी रुपयांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे बायोमेट्रिक हजेरीऐवजी मॅन्युअल रजिस्टरचा आधार घेतला जात असल्याने बोगस हजेरीला वाव मिळत असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी केला आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून मशिन्समध्ये तांत्रिक बिघाड, सर्व्हर समस्या आणि डेटा ट्रान्सफरमध्ये अडथळे येत असल्याचा दावा त्यांनी केला. यंत्रणा बंद असल्याने प्रामाणिक कर्मचाऱ्यांना लेट मार्क अथवा गैरहजेरीचा फटका बसण्याची शक्यता असून, कंत्राटी कामगारांच्या संख्येतही कागदोपत्री फेरफार होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
करारानुसार मशिन्सच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची असतानाही बिघाडानंतर तंत्रज्ञ वेळेत उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मशिन्स २४ ते ४८ तासांपेक्षा अधिक काळ बंद राहिल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद असतानाही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा दावा डॉ. पाटील यांनी केला. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च, निविदा प्रक्रिया, मशिन्सची गुणवत्ता, सर्व्हर व्यवस्था आणि कंत्राटदाराच्या कामगिरीचे स्वतंत्र ऑडिट करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

















