न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ सप्टेंबर २०२६) :- अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपीला पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. यादव यांनी आरोपी रामू कुंजल निसाद (वय ४०, रा. शंभू कॉलनी, विनायक नगर, मोशी) याला दोषी ठरविले.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६ अन्वये बीएनएस कलम ६४(१), ६५(२), ७४, ३५१ तसेच POCSO कायद्यातील कलम ४, ६ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चैत्राली भिसे यांनी तपास करून अवघ्या ३० दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
अभियोग पक्षाने खटला जलदगतीने चालविण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य केली. त्यानुसार सुनावणी पूर्ण करून २२ सप्टेंबर २०२६ रोजी निकाल देण्यात आला.
न्यायालयाने BNS कलम ६४(१) व ६५(२) अंतर्गत प्रत्येकी २० वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड, तर कलम ७४ व ३५१ अंतर्गत प्रत्येकी तीन वर्षांचा कारावास व दंड सुनावला. POCSO कलम ४ व ६ अंतर्गत प्रत्येकी २० वर्षांचा कारावास आणि कलम ८ अंतर्गत पाच वर्षांचा कारावास व दंड ठोठावण्यात आला. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.
विशेष सरकारी अभियोक्ता स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी मपोहवा एस. आर. सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात समन्वय साधला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मास्ती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव तसेच एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार व पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


















