न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२६) :- अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रशिक्षित अग्निशमन जवान, आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
महापालिकेने ‘अ’, ‘ड’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अनुक्रमे १०, ११ आणि २० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच मूर्ती संकलन केंद्रे आणि निर्माल्य संकलनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१४ ते २३ सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत ४९ हजार ८०३ गणेशमूर्तींचे संकलन/विसर्जन झाले असून, त्यामध्ये १० हजार १७० पर्यावरणपूरक आणि ३९ हजार ६३३ पीओपी मूर्तींचा समावेश आहे. तसेच २३ सप्टेंबरपर्यंत २२ हजार ६४७.२५ किलो निर्माल्य संकलित झाले आहे.
नागरिकांनी कृत्रिम तलावांचा वापर करून निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता संकलन केंद्रांवर जमा करावे आणि विसर्जनावेळी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


















