- उद्यान विभागाला ‘पैशांचे झाड’ भेट..
- कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाशेजारील खासगी बांधकाम प्रकल्पासाठी ५२ जुन्या झाडांची तोड झाल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने महापालिका उद्यान विभागाविरोधात आंदोलन केले. रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली उद्यान विभागातील अधिकारी महेश गारगोटे यांना ‘पैशांचे झाड’ भेट देत निषेध नोंदवण्यात आला.
या वृक्षतोड प्रकरणात झाडांची संख्या व वयाबाबत कागदपत्रांमध्ये फेरफार करून वृक्ष प्राधिकरणाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच संबंधित बांधकाम प्रकल्पाला देण्यात आलेल्या ना-हरकत दाखल्याची चौकशी करावी आणि बेकायदेशीर वृक्षतोडीला जबाबदार असणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रविराज काळे यांनी दिला. यावेळी ऋषिकेश कानवटे, विकी पासोटे, योगेश गायकवाड यांच्यासह पर्यावरणप्रेमी व नागरिक उपस्थित होते.
“झाडांचे रक्षण करायचे सोडून मनपाचे अधिकारी बिल्डरांच्या फायद्यासाठी जुन्या वृक्षांचा बळी देत आहेत. ५२ झाडांची कत्तल हा थेट पर्यावरणावर झालेला दरोडा आहे. जर मनपा आयुक्तांनी या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची व चौकशीची कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण शहरात महापालिकेविरोधात व्यापक आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”
— रविराज काळे (आप युवा आघाडी)


















