- शिवशाही प्रतिष्ठानची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२६) :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, विद्वत्ता, प्रशासन, साहित्यनिर्मिती, बलिदान आणि स्वराज्यरक्षणातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने बालभारतीकडे निवेदन देण्यात आले.
इयत्ता पाचवी किंवा त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर स्वतंत्र पाठ्यपुस्तक प्रकाशित करावे, तसेच ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समर्पक समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना विषय समजण्यासाठी चित्रे, कालरेषा आणि पूरक माहितीचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली.
याच विषयावर शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांची प्रतिष्ठानच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज जाधव व प्रदेश कार्याध्यक्ष अथर्व तावरे यांनी या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची भूमिका व्यक्त केली. विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य अभ्यासपूर्ण पद्धतीने समजावे, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.


















