- डोक्यात कड्याने व तुटलेल्या छत्रीच्या दांड्याने मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २४ सप्टेंबर २०२६) :- काळेवाडी परिसरात वाहनातून जात असलेल्या तरुणाला अडवून त्याच्या डोक्यात कड्याने तसेच तुटलेल्या छत्रीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कल्लाप्पा पांचाळ (वय २०, रा. साईनाथ कॉलनी, काळेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पार्वती शाळेजवळ, १०० खोली, काळेवाडी तसेच डी-मार्ट, थेरगाव परिसरात घडल्याचे नमूद आहे.
फिर्यादी हे त्यांच्या वाहनातून जात असताना आरोपींपैकी एका आरोपीचा भाऊ वेदांत याला वाहनाच्या मागील बाजूस बसल्याबाबत विनाकारण चापट मारल्याचा आरोप आहे. यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर डी-मार्ट, थेरगाव येथे जाण्यास सांगून तेथे गेल्यानंतर आरोपींपैकी एकाने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर इतर आरोपींनी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने त्याच्याकडील तुटलेल्या छत्रीच्या दांड्याने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण केल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. त्याचप्रमाणे वेदांत यालाही हातातील कड्याने डोक्यात मारून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी रिहान, आर्यन गौतम, अजिंक्य गायकवाड, दत्त्या, डुऱ्या उर्फ सिद्धार्थ खरात, राज आणि ओंकार दास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


















