- वायसीएम रुग्णालय परिसरातील प्रकार..
- विनापरवाना वाद्य वाजवून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२६) :- वायसीएम रुग्णालय परिसरातील शांतता क्षेत्रात विनापरवाना ढोल-ताशा आणि बॅण्ड वाजवत गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास वायसीएम रुग्णालय परिसरात घडला.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आशि गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीजीआय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता शांतता क्षेत्रात वाद्य वाजविल्याचे नमूद आहे.
रुग्णालयातील रुग्णांना वाद्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होण्याची शक्यता असतानाही ढोल, ताशा आणि बॅण्ड वाजवून विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच १६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मनाई आदेश लागू असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी मंडळाच्या महिला अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अमरदीप मोहन चांदगुडे, खजिनदार वैभव जनार्धन देवकर आणि न्यू मयूर ब्रास बॅण्डचे मालक ओंकार आढाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश आटवे व पोलीस उपनिरीक्षक अजित दिवटे करीत आहेत.


















