- १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी; तीन संशयित ताब्यात, सोन्याचे मंगळसूत्र व दुचाकी जप्त..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२६) :- गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने सतत दहा दिवस पाठपुरावा करत तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून चैन स्नॅचिंगसह दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि होंडा युनिकॉन दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट-३ कडून समांतर तपास सुरू होता. २३ सप्टेंबर रोजी तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील तीन आरोपी मोशी येथील आदर्शनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी संघर्ष कॉलनी, आदर्शनगर, मोशी येथे कारवाई करून इंदर अनिल राजपूत (वय २२), महेश कान्हा राजपूत (वय २६) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी प्राधिकरण, मोशी सेक्टर-४ येथून रात्रीच्या वेळी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावल्याची तसेच पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथून होंडा युनिकॉन दुचाकी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत सोन्याचे मंगळसूत्र आणि होंडा युनिकॉन मोटरसायकल पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. त्यामुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे आणि जेजुरी पोलीस ठाणे असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलीस ठाण्यांत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, अजित रुपनवर, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, तुषार वराडे, दिलीप राठोड, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे आणि सचिन गोनटे यांनी केली. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करीत आहेत.

















