न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- शहरातील अस्वच्छतेबाबतची छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी पालिका सभेत केले होते. त्याला प्रतिसाद देत महापौरांच्या व्हॅट्सअॅपवर शुक्रवारी (दि. २१) रोजी असंख्य छायाचित्रे प्राप्त झाली. ती छायाचित्रे आरोग्य विभागाकडे पाठविल्यानंतर त्यावर कारवाई करीत सफाई केली.
शहरात मोठ्या प्रमाणात कचरा समस्या निर्माण झाली आहे. त्यावर गुरुवारी झालेल्या सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. त्यावर महापौरांनी अस्वच्छतेबाबतची छायाचित्रे व्हॅट्सअॅपवर पाठविण्याचे आवाहन नगरसेवकांना केले होते. त्याला पहिल्या दिवशी ६ नगरसेवकांनी प्रतिसाद दिला. महापौरांनी ती छायाचित्रे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना पाठविली.
त्यांनी तातडीने दखल घेत, सदर ठिकाणचा कचरा हटवित साफसफाई केली. सफाईनंतरची छायाचित्रे डॉ. रॉय यांनी महापौरांना पाठविली आहेत. आरोग्य विभागाच्या या वेगवान कामाबद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले. नगरसेवकांनी प्रभागात अस्वच्छतेबाबत तक्रारी असल्यास छायाचित्रे पाठवावीत, असे आवाहन महापौरांनी केले आहे.















