- झाडे जगविण्याचा रहिवाशांचा संकल्प..
समर्थ हाऊसिंग सोसायटी आणि वृक्षमित्र अरुण पवार यांचा पर्यावरणपूरक उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ ऑक्टोबर २०२६) :- चिखली येथील घरकुल परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समर्थ हाऊसिंग सोसायटी, एफ-१६ आणि मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष, वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात पिंपळ, आवळा, वड, चिंच, कडुलिंब, आंबा, जांभूळ, करंज यांसह विविध देशी वृक्ष, फळझाडे आणि ऑक्सिजन देणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली.
या वेळी सोसायटीचे अध्यक्ष अशोक मगर, मीनाताई मोहिते, सुभाष लांडगे, लक्ष्मण जाधव, रंगनाथ आवारे, बिभीषण पवार, सुग्रीव पाटील, चतुरभुज चव्हाण, सोसायटीचे सर्व सभासद, तसेच स्वामी महिला बचत गट आणि समर्थ महिला बचत गटाच्या सदस्यांची उपस्थिती होती.
घरकुल परिसरात राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे रहिवाशांनी कौतुक केले. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेली सर्व झाडे जगविण्याचा संकल्पही यावेळी रहिवाशांनी केला. दरम्यान, वृक्षमित्र अरुण पवार यांनी नुकतेच जांबवडे येथील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी एक हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. आजपर्यंत त्यांनी राज्यभरात ५० हजारांहून अधिक झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. वृक्षारोपणासाठी इच्छुक नागरिक आणि संस्थांना ते देशी वृक्ष, फळझाडे व फुलझाडांची रोपे उपलब्ध करून देत आले आहेत. अनेक संस्था आणि नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. वृक्षारोपणासोबतच लावलेली झाडे नियमित पाणी देऊन जगविणे आणि त्यांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचा आग्रह अरुण पवार धरतात. त्यांच्या या कार्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जपली पाहिजेत. आपल्या कुटुंबात जेवढे लोक आहेत, तेवढी किमान झाडे लावायला हवीत. ‘एक व्यक्ती एक झाड’, ही संकल्पना प्रत्येक कुटुंबाला बंधनकारक करण्याचे कोरोना काळात आम्ही जिल्हाधिकारी, वन विभाग, महापालिका प्रशासनाला आवाहन केले होते. तसा पत्रव्यवहार करीत पाठपुरावा केला आहे. प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली तर पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होईल.
– अरुण पवार, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कारप्राप्त…


















