- एकता कर्मचारी संघटनेचे आयुक्तांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस, सानुग्रह अनुदान आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कामाचा मेहनताना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी एकता कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दिवाळी ८ नोव्हेंबर रोजी असूनही २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत परिपत्रक प्रसिद्ध झाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेने पत्रात म्हटले आहे.
आरोग्य कर्मचारी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करतात. त्यांना दीडपट दराने मिळणारा मेहनताना दिवाळीपूर्वी देण्याचे परिपत्रक १ ऑक्टोबरला काढूनही अद्याप बिले मंजूर झाली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बिलांच्या प्रक्रियेसाठी अतिरिक्त कर्मचारी नेमून सायंकाळी व सुट्टीच्या दिवशीही कामकाज करावे आणि सर्व थकीत रक्कम लवकर अदा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

















