- मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याविरोधात ACB ची सापळा कारवाई..
- प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याच नाव पुढ?..
- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोरी प्रकरणात मोठा खुलासा!…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लाचखोरी प्रकरणाने महापालिका वर्तुळात खळबळ उडवली आहे. मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंबासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) काल, २९ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणातील तपासाच्या कागदपत्रांतून धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकरण केवळ एका टेंडरपुरते मर्यादित नसून तीन टेंडरच्या फाईलशी संबंधित असल्याचे तक्रार पडताळणीच्या नोंदीतून स्पष्ट होते.
पाच टेंडर, ९१.५७ लाखांचे काम आणि अर्धा टक्का कमिशन!…
ACB च्या कागदपत्रांनुसार, संबंधित ठेकेदाराला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन टाकण्याची एकूण पाच कामे मिळाली होती. या कामांची एकत्रित निविदा रक्कम ९१ लाख ५७ हजार ६८ रुपये होती. या कामांचे वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी तसेच करारनाम्यावर सह्या घेण्याच्या प्रक्रियेत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ACB च्या नोंदीनुसार, यापूर्वी अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी निविदा रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर तक्रारदाराच्या तीन टेंडर फाईल मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याकडे पाठविण्यात आल्या.
तीन फाईल, ३८ लाखांची कामे आणि १९ हजारांची मागणी!…
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा तपशील म्हणजे तक्रारदाराच्या टेबलवर असलेल्या तीन टेंडर फाईलची एकत्रित रक्कम ३८ लाख रुपये होती. या रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे ११ जून २०२६ रोजीच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याचे ACB च्या तक्रारीत नमूद आहे. तसेच, यापूर्वीही तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे पडताळणीत मान्य झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
पाच महिन्यांपूर्वीची तक्रार, आता कारवाई!..
- २९ मे २०२६ : तक्रारदाराने मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांची भेट घेतल्याचा उल्लेख.
- ११ जून २०२६ : लाच मागणीबाबत तक्रार नोंदविण्यात आली आणि पडताळणी झाली.
- २९ ऑक्टोबर २०२६ : संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
- दुपारी ३ वाजता : मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना अटक करण्यात आली.
- त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेतील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!…
या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील टेंडर प्रक्रिया, वर्क ऑर्डर आणि करारनाम्यांवरील सह्यांच्या प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एका ठेकेदाराच्या पाच कामांच्या फाईलमधून लाच मागणीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका तपासात समोर येते, याकडे आता महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ACB च्या तक्रारीत अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याबाबतही लाच मागणीचा उल्लेख आहे. मात्र, त्यांच्याविरोधातील स्वतंत्र गुन्हा किंवा अटकेची माहिती या कागदपत्रात नाही. त्यामुळे त्यांना या प्रकरणात आरोपी ठरविणे योग्य ठरणार नाही.


















