- लाईफ सर्टिफिकेट अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा गंडा; APK फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि. ३० ऑक्टोबर २०२६) :- लाईफ सर्टिफिकेट काढून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी बावधन येथील एका ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक आणि APK फाईल डेव्हलपरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमनकुमार कुंजबिहारी लाल (वय ६९, रा. बावधन) यांचे फेसबुक अकाउंटवर ‘PNB HMRS Online Registration’ नावाचे पेज दिसले. त्यावरून लाईफ सर्टिफिकेट काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला.
त्यानंतर संबंधित व्यक्तीने ‘PNB Pension Life Certificate Update Online’ नावाची APK फाईल डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ही फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १९ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक पुढील प्रकणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिकलगार करीत आहेत.


















