- स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना; बजेट बुकमधील कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 30 ऑक्टोबर 2026) :- महानगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, असे निर्देश स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समिती बैठकीत दिले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज पार पडली. यामध्ये विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच, महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा व आर्थिक नियोजनाचा सभापती बारणे यांनी सविस्तर आढावा घेतला. महापालिकेची तिजोरी सावरण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी सर्व विभागांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत उपस्थितीबाबत कडक निर्देश देण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकारी, विभागप्रमुख, कार्यकारी अधिकारी आणि ह्युमन रिसोर्सेस (HR) यांच्या उपस्थितीची नोंद घेतली जाणार आहे. जे अधिकारी अनुपस्थित असतील, त्यांना अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल किंवा त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणाला बैठकींना पाठवावे. महानगरपालिकेचे आर्थिक धोरण सुधारण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला खर्च कसा वाचवता येईल, याबाबतचा सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक राहील, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.
महापालिकेच्या मालमत्तेचा योग्य वापर करण्यावर भर द्यावा. वापराविना मोकळ्या पडलेल्या मालमत्तामधून मनपाला कसे उत्पन्न मिळेल, याचे नियोजन करावे.
महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे योग्य मॉनिटरिंग करणे ही केवळ एका विशिष्ट विभागाची किंवा व्यक्तीची जबाबदारी नसून, महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची ती सामायिक जबाबदारी असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. जर एखादा विभाग सोडून इतर काही निदर्शनास आले, तर संबंधित विभागाला सांगून ती जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक हजेरी १००% असणे अनिवार्य असून, यामध्ये कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र, काही ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचारी पाणी पुरवठ्याचे काम करतात आणि त्यांची बायोमॅट्रिक हजेरी होत नाही, याबाबत शहानिशा करून योग्य ती सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
बजेट बुकमध्ये समाविष्ट असलेली सर्व कामे आगामी काळात निश्चित वेळेत पूर्ण झाली पाहिजे. ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत किंवा ज्या कामांचे बजेट मंजूर झाले आहे, त्या कामांचा सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश सभापती बारणे यांनी बैठकीत दिले. तसेच, अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल्स विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत; फाईल किती दिवस प्रलंबित आहे आणि जास्त काळ थांबल्यास त्याची कारणे वरिष्ठांना पत्रद्वारे कळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. फाईल मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. याशिवाय, महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची कर्तव्ये आणि कामाची स्थिती याचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.
“महानगरपालिकेचा कारभार करत असताना जनतेच्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे आणि प्रत्येक विभागाने खर्चात बचत करणे काळाची गरज आहे. आमच्या बजेट बुकमध्ये जी कामे मंजूर आहेत, ती वेळेत आणि दर्जेदार झालीच पाहिजेत. जर एखादी फाईल किंवा काम विनाकारण थांबत असेल, तर त्यामागील ठोस कारण आम्हाला लेखी स्वरूपात हवे आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला अधिक गतिशीलता द्यावी, हीच स्थायी समितीची मुख्य अपेक्षा आहे.” – अभिषेक बारणे, सभापती- स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.


















