- आयुक्त पलायनाच्या मुद्द्यावरून नगरसेवकांनी केली सभा तहकूब..
- मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्या लाचखोरी प्रकरणावरून सभागृहात जोरदार गदारोळ..
- आयुक्तांच्या भूमिकेवर नगरसेवकांचा संताप, बडतर्फीच्या कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्या लाचखोरी प्रकरणावरून आज जोरदार गदारोळ झाला. प्रशासनाच्या कारभारावर आणि आयुक्तांच्या भूमिकेवर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लाचखोरीसारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सभागृहात आले आणि अवघ्या दहा मिनिटांत निघून गेले. यामुळे नगरसेवकांचा संताप आणखी वाढला. अखेर प्रशासनाचा निषेध नोंदवत सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानंतर सभा २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.
आज महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौर रवि लांडगे गैरहजर असल्याने उपमहापौरांनी सभेचे कामकाज पाहिले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम सभेला उपस्थित होते.
सभेच्या कामकाजादरम्यान मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्या लाचखोरी प्रकरणावर चर्चा सुरू झाली. नगरसेवक विश्वजीत बारणे आणि भाऊसाहेब भोईर यांनी हा विषय उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. याचदरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सभागृहात दाखल झाले. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत ते सभागृहातून निघून गेले. गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना आयुक्त सभागृहात थांबले नसल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी अधिकारी लाचखोरीत मग्न असून नगरसेवकांचे फोनही उचलत नसल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असून आयुक्तांचा कारभार योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. नगरसेवकांचा सन्मान आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित अधिकारी पुन्हा कामावर येत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नगरसेवकांना वेळ मिळत नसल्याची तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा ठराव करण्याची मागणी त्यांनी केली.
नगरसेवक शीतल शिंदे यांनी लाचखोरीची घटना शहराला काळिमा फासणारी असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांकडून पत्रव्यवहाराला उत्तरे दिली जात नाहीत, असा आरोप करत त्यांनी अनधिकृत बांधकामांचा मुद्दाही उपस्थित केला. मोरया डेव्हलपर्स, भक्ती बिल्डर, डॅफोडिल्स प्रकल्पातील आठव्या मजल्याचे कथित अनधिकृत बांधकाम आणि रुणाल डेव्हलपर्स यांच्यासह विविध प्रकल्पांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अग्निशमन यंत्रणेच्या उपलब्धतेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
बांधकामांच्या मंजूर आराखड्यात आणि प्रत्यक्ष बांधकामात तफावत असल्याने फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. भविष्यात पुनर्विकास करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली.
आयुक्तांच्या भूमिकेवर सभागृह नेत्यांची नाराजी; सभा तहकूब करण्याची मागणी
सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना या गंभीर घटनेचे गांभीर्य नसल्याची टीका केली. लाचखोरीच्या विषयावर चर्चा सुरू असताना आयुक्त सभागृहात आले आणि अवघ्या दहा मिनिटांत निघून गेले. शहराचे नाव बदनाम होत असताना प्रशासनाची भूमिका गंभीर नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. तसेच सभा तहकूब करण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण तापले. अखेर महापौरांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा पुढील सभेपर्यंत म्हणजेच २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. लाचखोरी प्रकरण, अधिकाऱ्यांवरील कारवाई आणि आयुक्तांच्या भूमिकेवरून झालेल्या या गदारोळामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिकेची भुमिका…
आज झालेल्या महानगरपालिका सभेत आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी हे उपस्थित होते, तथापि पंतप्रधान प्रगती योजनेची व्हिडीओ काॅन्फरन्सींगद्वारे तातडीची ऑनलाईन बैठक असल्याने ते अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना महापालिका सभेस उपस्थित रहाण्याच्या सूचना देऊन ऑनलाईन बैठकीस (व्ही.सी.) उपस्थित होते. बैठक पूर्ण पार पडल्यानंतर ते महापालिका सभेस उपस्थित रहाण्यासाठी निघाले असता महापालिका सभा तहकूब झाल्याचे समजले.


















