- तब्बल २३ पैकी १७ स्थानकांवरच सेवा; स्थानकांच काम अपुर्ण..
- पुणे मेट्रोच्या तुलनेत पिंक लाईनचे तिकीटदरही तीनपट?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३१ ऑक्टोबर २०२६) :- एकीकडे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा आणि दुसरीकडे प्रत्यक्षात सहा स्थानकांची अपूर्ण कामे, महागडे तिकीटदर आणि काही स्थानकांवरील अपुऱ्या सुविधा, असे चित्र पुणे मेट्रो लाईन-३ अर्थात माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाबाबत समोर आले आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उद्घाटनासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान २३ पैकी सहा स्थानके अद्याप प्रवासी सेवेसाठी तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
माण-हिंजवडी-शिवाजीनगर ही २३.२०३ किलोमीटर लांबीची संपूर्ण उन्नत मेट्रो मार्गिका असून, या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. सुमारे ८,३१३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात आला आहे. हिंजवडी आयटी पार्कला पुणे शहराशी जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मात्र, उद्घाटनाच्या वेळी संपूर्ण मार्गिका प्रवाशांसाठी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
२३ पैकी सहा स्थानके अपूर्ण..
या प्रकल्पातील एकूण २३ पैकी १७ स्थानकेच ३ नोव्हेंबर रोजी प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. उर्वरित सहा स्थानके म्हणजेच स्थानक क्रमांक १३, १४, १५, १६, २० आणि २२ उद्घाटन सोहळ्यात समाविष्ट नसतील. यापैकी दोन स्थानके नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर उर्वरित चार स्थानके जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे उद्घाटनानंतरही संपूर्ण मेट्रो मार्गिकेचा लाभ प्रवाशांना तातडीने मिळणार नाही. प्रकल्पाचे उद्घाटन आणि संपूर्ण प्रकल्पाची पूर्तता यामध्ये अंतर राहणार आहे.
ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रकल्पाची भौतिक प्रगती ९८.२० टक्के झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मात्र, उर्वरित सहा स्थानकांची कामे पूर्ण होण्यासाठी जानेवारी २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे ९८.२० टक्के भौतिक प्रगती आणि प्रत्यक्ष प्रवासी सेवेसाठी उपलब्ध असलेली यंत्रणा यामध्ये फरक असल्याचे दिसून येते.
पुणे मेट्रोच्या तुलनेत तीनपट तिकीटदर..
मेट्रो सुरू होण्याआधीच तिकीटदराचा मुद्दा प्रवाशांसाठी चिंतेचा ठरत आहे. पुणे मेट्रोच्या तुलनेत पिंक लाईनचे तिकीटदर जवळपास तीनपट असल्याची माहिती समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासासाठी ६० रुपयांपेक्षा अधिक भाडे मोजावे लागणार असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हा प्रवास आर्थिकदृष्ट्या कितपत परवडणारा ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक कोंडीपासून दिलासा देणाऱ्या मेट्रोचा वापर करण्यासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
काही स्थानकांवर एका जिन्यासहच प्रवासी सेवा!..
प्रकल्पाच्या सद्यस्थितीच्या माहितीनुसार काही स्थानकांवर सुरुवातीला केवळ एका जिन्यासह प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी, प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्याचे पर्याय याबाबत प्रश्न निर्माण होतात. मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा होणाऱ्या मेट्रो स्थानकांवर सर्व सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध असणे अपेक्षित असताना काही सुविधा अपूर्ण अवस्थेतच सेवा सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
एकूणच, पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा मेट्रो लाईन-३ प्रकल्प अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. मात्र, सहा स्थानकांची अपूर्ण कामे, तुलनेने जास्त तिकीटदर, काही स्थानकांवरील अपुऱ्या सुविधा आणि खर्चातील तफावत यामुळे उद्घाटनाच्या उत्साहावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असले तरी प्रवाशांना संपूर्ण, परवडणारी आणि सुविधायुक्त मेट्रो सेवा मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.


















