- काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३१ ऑक्टोबर २०२६) :- काळेवाडीतील इंडियन कॉलनी परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणावर तिघांनी मिळून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश दत्ता पवार (वय २३, रा. काळेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास आकाश हा घरी पायी जात होता. त्यावेळी इंडियन कॉलनीतील अक्षय ऊर्फ गोट्या छत्री, कृष्णा सोनवणे आणि शकलीन शेख यांनी त्याला रस्त्यात अडवले. तीन दिवसांपूर्वी फोनवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी अक्षय याने आकाशचा गळा हाताने दाबला, तर शकलीन याने लोखंडी कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आकाशने वार चुकवल्याने तो त्याच्या पाठीवर लागला. त्यानंतर कृष्णा सोनवणे याने त्याच कोयत्याने आकाशच्या डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, आकाशच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, कृष्णा सोनवणे याने हातातील कोयता हवेत फिरवत मध्ये येणाऱ्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी अक्षय ऊर्फ गोट्या छत्री, कृष्णा सोनवणे आणि शकलीन शेख यांच्याविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.

















