- मेट्रो स्टेशनमध्ये पावसामुळे पाणीगळती..
- पीएमआरडीएकडून ‘तात्पुरता अडथळा’ असल्याचा खुलासा!..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे | दि. : २ नोव्हेंबर २०२६ :- पुणे मेट्रोच्या पीएमआर-०१ स्टेशन येथे पावसाचे पाणी थेट स्टेशनच्या मेझानाइन स्तरावर झिरपल्याचा प्रकार समोर आला आहे. मेट्रोसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील स्टेशनमध्ये पाणीगळती झाल्याने बांधकामाचा दर्जा आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकारानंतर पीएमआरडीए प्रशासनाने खुलासा करत पाणीगळतीचे कारण टेरेस स्लॅबवरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपमध्ये निर्माण झालेला तात्पुरता अडथळा असल्याचे सांगितले आहे.
पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश संरचनेच्या टेरेस स्लॅबवर पावसाचे पाणी साचले होते. निचरा पाइपमध्ये अडथळा निर्माण झाल्याने पाण्याचा ओव्हरफ्लो झाला. हे पाणी स्टेशन बॉक्स आणि प्रवेश संरचनेमधील गॅपमधून झिरपून मेझानाइन स्तरावर आले.
प्रशासनाने संबंधित पाइपमधील अडथळा दूर केल्याचा आणि आता पाण्याचा निचरा सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे. तसेच स्टेशन बॉक्स किंवा प्रवेश संरचनेच्या कोणत्याही संरचनात्मक घटकांमध्ये दोष नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
मात्र, या खुलाशामुळे काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहतात. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपमध्ये अडथळा निर्माण होईपर्यंत नियमित तपासणी का झाली नाही? टेरेसवरील पाणी साचून ते थेट स्टेशनच्या आतील भागात झिरपेपर्यंत प्रशासनाला याची कल्पना कशी आली नाही? भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नेमकी कोणती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे?
केवळ पाइपमधील तात्पुरता अडथळा दूर करून जबाबदारी संपणार का? मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण निचरा यंत्रणेची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या खुलाशापेक्षा प्रत्यक्षात केलेल्या उपाययोजना आणि त्यांची परिणामकारकता महत्त्वाची ठरणार आहे.

















