- इंद्रायणीनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३१ ऑक्टोबर २०२६) :-
भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून कोणतीही माहिती न देता पसार झाला. ही घटना गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास प्रितम हाऊससमोर घडली.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सचिन शिवाजी माने (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायल ११२ वर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सद्गुरुनगर कमानीजवळ एका व्यक्तीचा अपघात झाला असून त्याला रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याची माहिती कॉलरने दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता अंदाजे ३५ वर्षांचा एक अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळला. अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत त्याला धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर जखमीला मदत न करता तसेच अपघाताची माहिती न देता चालक घटनास्थळावरून पसार झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस त्याबाबत तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.

















