न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०९ नोव्हेंबर २०२६) :- दि. विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे आणि महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोशी येथील अभिषेक इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात ‘दिवाळी पहाट – सूर तेच छेडितात’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिक आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक आणि त्यांच्या सहकारी गायक-वादकांनी अजरामर हिंदी-मराठी गीतांची सुरेल मेजवानी सादर केली. त्यामुळे दिवाळीची पहाट संगीतमय झाली.
बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे, ट्रस्टचे अध्यक्ष गुरुराज चरंतीमठ, कार्यकारी संचालिका गीता चरंतीमठ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राम दराडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात बँकेचे संचालक तथा ज्येष्ठ उद्योजक रविंद्र महाजन यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही बँकेची बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर रविजी लांडगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


















