न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- शहरात करोनाबाबत महापालिकेने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. महापालिकेने याबाबत अभियान राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी स्वीकृत सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. शहरात करोना बाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, भोईर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरामध्ये करोना विषाणुची साथ पसरू नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या दवाखान्यात आणि रूग्णालयात आवश्यक औषधे उपलब्ध करावीत. महापालिकेच्या रूग्णालयात बाधित किंवा संशयित रूग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करावा. महापालिकेची सर्व कार्यालये, दवाखाने, रुग्णालये, शाळा, केंद्रांमध्ये हात धुण्याचे आणि हात निर्जंतुक करण्याचे द्रव्य उपलब्ध ना करावे. सर्व कार्यालये, दवाखाने, रुग्णालये, शाळा, उद्याने, विरंगुळा केंद्र आणि विविध प्रकल्पांच्या केंद्रांमध्ये या विषाणूच्या साथीची माहितीपत्रके लावणे गरजेचे आहे, असे या निवेदनात भोईर यांनी म्हटले आहे.