न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्याचे सुमारे ७४५ कोर्टीहून अधिक रक्कमेचे काम मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी शहरातील एका भाजप आमदाराच्या नातेवाईकाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर दबाव वाढविला आहे. हा नातेवाईक महापालिकेच्या सभागृहाचा सदस्य नसतानाही गेल्या तीन – चार दिवसांपासून महापालिकेत ठाण मांडून सर्वांचा विरोध मोडून काढण्यासाठी कार्यरत असल्याचे पहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शहर पातळीवरील पदाधिका-यांना ‘ मॅनेज ‘ करण्यात संबंधिताने यश मिळविल्याची माहिती समोर आली असून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या या निविदेचा विषय कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावण्यासाठी भाजपाचे काही सदस्य कामाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी – चिंचवडमधील विविध राजकीय पक्षातील राजकारण्यांनी एकत्र येऊन शहरातील रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करण्याचे काम काढण्याचा घाट घातला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हाताशी धरून पुढील सात वर्षांसाठी हे काम करण्याचा निर्णय घेत प्रशासनामार्फत ६४६ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. या निविदेसाठी राजकारण्यांनी आपला अप्रत्यक्ष सहभाग असलेली कंपनी काढली. निविदेतील अटी व शर्ती आपल्याच कंपनीला फायदेशीर ठरतील, अशाच निश्चित केल्या. निविदा प्रक्रियेत या कंपनीने सहभाग घेतला आणि महापालिकेने संबंधित कंपनीला पात्रही केले. त्यानंतर या कामाला सर्वच स्तरांतून विरोध सुरू झाला आहे. सफाई कामगारांनी महापालिकेसमोर जोरदार आंदोलने केली. परंतु, आयुक्त हर्डीकर हे या कामाच्या मंजुरीसाठी ठाम राहिले आणि कामाच्या खर्चात १०० कोटींची वाढ करून ती ७४५ कोर्टीवर नेली आहे. रक्कम वाढल्यामुळे त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे वाढीव रक्कमेला मंजुरी घेण्याची उपसूचना मांडण्यात आली. मात्र त्यावेळी विरोधकांनी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे सत्ताधारी भाजपकडून उपसूचनेचे वाचन झाले नाही. त्यामुळे या कामाला मंजुरी घेण्याचा विषय मागे पडला. दरम्यान, स्थायी समितीत खांदेपालट झाले आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी शहरातील एका भाजप आमदाराच्या नातेवाईकाने रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करण्याच्या कामाला मंजुरी घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या कामाला विरोध होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनाही मॅनेज केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
विरोधी पक्षाचे स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे पदाधिकारी आणि आयुक्त हर्डीकर यांच्यात संबंधिताने भेटीगाठी घालून दिल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाईच्या कामाला वरवरचा विरोध होताना दिसून येत आहे. येत्या २० मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे या कामासाठी येणाऱ्या वाढीव खर्चाला मंजुरी घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. आयुक्तांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळावा, यासाठी महापालिका भवनात हालचाली सुरू होत्या. या कामाला मंजुरी मिळाल्यास सफाई कामगार कितपत आक्रमक भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.















