न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम), भोसरी व पिंपरी कॅम्पमधील जिजामाता रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तेथील आयसीयू विभागासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर थेट पद्धतीने खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी ७७ लाख ४० हजार खर्च करण्यात आला आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वायसीएमसह भोसरी व जिजामाता रुग्णालय तसेच, खासगी रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढून बेड फूल झाले आहेत. तसेच, आयसीयू व ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पालिकेने वायसीएम, भोसरी व जिजामाता रुग्णालयात आयसीयू विभाग नव्याने सुरू केले आहेत. त्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची अत्यावश्यकता असल्याचे वैद्यकीय विभागाने ११ ऑगस्टच्या पत्राद्वारे मागणी केली होती.
त्यानुसार बारामतीच्या जीव्हीएस एअर सर्व्हिसेस इंडिया ची प्रा. लि. कडून थेट पद्धतीने ५०० नग ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी ७७ लाख ४० हजारांचा खर्च करण्यात आला आहे.















