- उपआयुक्त कार्यालयाकडून कामगारांच्या मागण्यांची दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कल्याणकारी मंडळ, पुणे विभागीय उपआयुक्त कार्यालयातील नोंदणी आणि मिळणारे लाभ या बाबतीतील गोंधळाबाबत बांधकाम कामगार संघटनेने कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर उपआयुक्त कार्यालयाने आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल. येत्या मंगळवारी (दि. २५) नियोजित आंदोलन करू नये, असे लेखी पत्र देऊन कळविले आहे.
याबाबत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी कामगार उपआयुक्त कार्यालयाला विविध मागण्यांबाबत आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. संघटनेने केलेल्या मागण्यांची दखल घेत उपआयुक्त कार्यालयाने संघटनेला कळविले आहे. संस्थेला तसेच संघटनेच्या कामगारांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्याचा तपशील कार्यालयास सादर करावा, असे कळविण्यात आले आहे.
तसेच नोंदीत बांधकाम कामगारांना कामगार सुविधा केंद्राचे स्मार्ट कार्ड वाटपाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन कामगार संघटनेस करण्यात आले आहे.















