न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. ऑगस्ट. २०२०) :- डासांमुळे हिवताप, चिकुनगुनिया असे आजार होत असून, त्या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी घरात व परिसरात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. डास उत्पत्ती होऊन देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी – चिंचवड महापालिकेने नागरिकांना केले आहे.
शहरात कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. पावसाळ्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे अनेक आजारांची भर पडते. हे रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया होण्याची शक्यता वाढते.
डासांची वाढ होऊ नये म्हणून घरात पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवण करून ठेऊ नये. दर आठवड्याने साठवलेले पाणी एकदा पूर्णपणे वापरून ड्रम कोरडा करून सुकवून परत भरावा. त्यामुळे पाण्यात असलेले अंडी मारल्या जातील. तसेच, घराभोवतीच्य साठलेल्या पाण्याची डबकी बुजविली किंवा साचलेले पाणी वाहते केले तर डासांच्या उत्पत्तीस आळा बसेल. पाण्याच्या टाक्या पूर्णपणे झाकण टाकून बंद ठेवाव्यात, म्हणजे डास टाकीत शिरू शकणार नाहीत.
घरातील फ्लॉवर पॉट, कुलर, मनीप्लॅन्ट, घरातील छोटे शोभेचे कारंजे, फ्रिजचा खालचा ट्रे अशा दुर्लक्षित ठिकाणी पाणी साचते. दर आठवड्यात या वस्तूतील पाणी बदलावे. घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर टाकलेले भंगार साहित्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. ते भंगार साहित्य काढून टाकावे किंवा नष्ट करावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.















