न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- देशावर ओढवलेल्या संकटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २० ऑक्टोबर रोजी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील परिस्थितीविषयी भाष्य केलं. मोदी यांनी देशातील करोना रुग्णसंख्या व अमेरिका, ब्राझील या देशातील परिस्थितीविषयी तुलनात्मक माहिती दिली. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लोकांकडून दुर्लक्ष होत असलेल्या एका गोष्टीवर चिंता व्यक्त केली.
कोरोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काही जण मास्क न घालता फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होत आहे.कोरोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वारेंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.
















